दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनामुळे शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील CJP आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात चर्चा सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केले. या मोर्चादरम्यान जमावाकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनांनंतर अनेक राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांनी आपापली भूमिका मांडली आहे.
अशातच बुधवारी, 22 जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा आणि जंतरमंतर व आसपासच्या परिसरातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या विषयांनी जोरदार खळबळ उडवून दिली. जंतर-मंतरजवळ ‘कॉकरोच जनता पार्टी’ शी संबंधित आंदोलक आणि सुरक्षा दले यांच्यात बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील आंदोलनावर व त्यावरील पोलीस कारवाईवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनी ‘इन्स्टाग्राम’वर एक स्टोरी शेअर केली आहे.
“आंदोलकांवर होणारा हिंसाचार खपवून घेतला जाऊ नये”
पहिल्या स्टोरीमध्ये तिने म्हटलं आहे की, “मला आंदोलनांबद्दल बोलण्यासाठी असंख्य वेळा सांगण्यात आले आहे – तर मी इतकंच म्हणेन – लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा हक्क आहे – आंदोलकांकडून पोलिसांवर होणारा हिंसाचार आणि पोलिसांकडून आंदोलकांवर होणारा हिंसाचार खपवून घेतला जाऊ नये. तुम्ही शैक्षणिक सुधारणांच्या चळवळीला पाठिंबा देऊ शकता, परंतु त्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षाला आणि त्याच्या विचारधारेला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका. आधीच सावध राहा आणि त्यांच्या खऱ्या हेतूंबद्दल माहिती करून घ्या. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाने देशाचे सर्वोत्तम हित लक्षात ठेवले पाहिजे आणि सर्वोच्च विकासासाठी सत्ताधारी पक्षाचा शत्रू बनून त्यांची बदनामी करण्याऐवजी, त्यांना चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे. कोणत्याही सोशल मीडियावरील ट्रेंडला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका, केवळ ट्रेंड आहे म्हणून बंड करू नका आणि कोणत्याही विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊ नका. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित प्रथम ठेवले जाते, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे, परंतु ज्या क्षणी आंदोलने धर्माच्या मुद्द्यावर जातात, नीट, पेपरफुटी आणि एनटीएच्या कक्षेबाहेर जातात, तेव्हा त्यामागील हेतू बदलतो.”
“विद्यार्थ्यांच्याच हिताला पाठिंबा द्या”
तसेच एका जखमी विद्यार्थ्यांचा व्हिडिओ स्टोरीला शेअर करत तिने म्हटल की, “विद्यार्थ्यांवर किंवा पोलिसांवर होणारी कोणतीही अनावश्यक हिंसा खपवून घेतली जाऊ नये. लज्जास्पद. याचाच अर्थ आहे की, केवळ विद्यार्थ्यांच्याच हिताला पाठिंबा द्या आणि तरुणांचे मन वळवू शकणाऱ्या इतर कोणत्याही विचारसरणींपासून जागरूक रहा.”
“नीट आंदोलन खरं, सरकार जबाबदार आहे”
पुढे आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “नीट आंदोलन खरं होतं. व्यवस्थेने विद्यार्थ्यांना खरोखरच अपयशी ठरवलं होतं. सरकार जबाबदार आहे. हे कोणीही नाकारत नाही. पण मग एसएफ१ (SF1) मध्ये घुसली. आयसा (AISA) मध्ये घुसली. एआयएसएफ (AISF) मध्ये घुसली. विरोधी पक्षाचे खासदार घुसले. आणि काही तासांतच घोषणा बदलल्या. प्रभू रामाचा अपमान झाला. भगवान शिवाची थट्टा झाली. भारत मातेचा अपमान झाला. एका परीक्षेच्या विरोधातील आंदोलनात. निष्पक्ष पेपरफुटीच्या चौकशीची मागणी करणारा एक विद्यार्थी, स्वतःच्याच देवांचा आणि देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला कसा उभा राहिला? हे आंदोलन आपोआप संपले नाही. ज्या लोकांनी त्याला पाठिंबा देण्याचा दावा केला होता, त्याच लोकांनी दिवसाढवळ्या त्याची हत्या केली. म्हणून प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याने हा प्रश्न विचारला पाहिजे. आज तुम्हाला खरोखर कोणी अपयशी ठरवलं, व्यवस्थेने की ज्यांनी तुमचा आवाज दाबला त्या लोकांनी?”