कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि ५५ आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारवर मोठं संकट कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाविरुद्ध शिवसैनिक राज्यात अनेक ठिकाणी आक्रमक झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठींबा दर्शवण्यासाठी शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत.
दरम्यान, शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तेथे आक्रमक शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच, हातात भगवे झेंडे घेऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तानाजी सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले आणि आता पक्षाशी गद्दारी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
शिंदे समर्थक तानाजी सावंत यांनी पुण्यात झालेल्या त्यांच्या कार्यालयाची तोडफोडीला प्रतिउत्तर देत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं… ‘
Edited by – Krushnai Sawant