नवी दिल्ली: मध्यरात्रीची ती वेळ, जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील किर्र अंधार आणि अचानक 30 बुलडोझरचा धडधडाट सुरू झाला! राजधानी दिल्लीतील फैज-ए-इलाही मशीद परिसरात मंगळवारी रात्री हायकोर्टाच्या आदेशाने मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई शांततेत पार पडली नाही. बुलडोझर चालताच परिसरात तणाव निर्माण झाला, दगडफेक झाली आणि प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पहाटेपर्यंत चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्याने संपूर्ण दिल्लीचे लक्ष वेधून घेतले आहे.
रामलीला मैदानाजवळ असलेल्या फैज-ए-इलाही मशिदीच्या आजूबाजूला असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने हातोडा चालवला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतर महानगरपालिकेने (MCD) रात्री उशिरा ही मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे, मशिदीच्या मुख्य वास्तूला कोणताही धक्का न लावता केवळ वाढीव अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. 30 बुलडोझर एकाच वेळी रस्त्यावर उतरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कारवाई सुरू असताना जमावाने तीव्र विरोध दर्शवत एमसीडी कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात पाच पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. "सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आम्ही संपूर्ण परिसराची नऊ झोनमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक झोनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी तैनात आहेत," अशी माहिती जॉइंट कमिशनर मधुर वर्मा यांनी दिली.
दिल्लीतील ही कारवाई अचानक झालेली नाही. 6 जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने मशीद आणि कब्रस्तानला लागून असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. जरी समितीने ही 'वक्फ'ची संपत्ती असल्याचा दावा केला असला, तरी अतिरिक्त जमिनीच्या मालकीची वैध कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरले. विशेष म्हणजे, न्यायालयात सुनावणी दरम्यान मुस्लिम पक्षाच्या समितीने 'अतिक्रमण हटवण्यास आमचा आक्षेप नाही' असे स्पष्ट केल्यानंतरच हा बुलडोझर फिरवण्यात आला.
मशिदीच्या परिसरातील सुमारे 80 ते 90 टक्के बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले आहे. मात्र, अद्याप 10 ते 20 टक्के बांधकाम शिल्लक असून त्यावर पुन्हा बुलडोझर फिरवला जाणार आहे. घटनास्थळावर पडलेला ढिगारा इतका प्रचंड आहे की तो हटवण्यासाठी सुमारे 200 ट्रक लागणार असून या कामासाठी किमान चार दिवस लागतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करण्यात आले असून सामान्य नागरिकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दिल्लीतील या मोठ्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले आहे. तुर्कमान गेट परिसरातील ही कारवाई केवळ अतिक्रमण हटवण्यासाठी नसून, कायदेशीर चौकटीत राहून केलेली प्रशासकीय मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.