नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-मेरठ प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (Delhi Meerut Regional Rapid Transit System, RRTS) प्रकल्पातील उर्वरित 82 किलोमीटर मार्ग तसेच 23 किलोमीटर लांबीच्या मेरठ मेट्रो सेवेचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे दिल्ली-एनसीआर परिसरातील प्रादेशिक संपर्क व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उद्घाटनानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून प्रवासी सेवा सुरू करण्यात आली.
पंतप्रधानांनी दिल्लीतील सराय काले खान ते न्यू अशोक नगर दरम्यानचा पाच किलोमीटर मार्ग, तसेच मेरठ साऊथ ते मोदीपुरम दरम्यानचा 21 किलोमीटर आरआरटीएस मार्ग आणि शताब्दीनगर स्थानकापासून मेरठ मेट्रो कॉरिडॉरचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे दिल्ली ते मेरठ प्रवासाचा कालावधी आता एका तासापेक्षाही कमी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (National Capital Region Transport Corporation, NCRTC) अधिकाऱ्यांसह पंतप्रधानांनी मेट्रो प्रवास करत प्रवाशांशी संवादही साधला.
ताशी कमाल 180 किलोमीटर वेग आणि सुमारे 160 किलोमीटर कार्यरत वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आलेली नमो भारत ट्रेन (Namo Bharat Train) दिल्ली, साहिबाबाद, गाझियाबाद, मोदीनगर आणि मेरठ यांसारख्या प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. या मार्गावर धावणारी मेरठ मेट्रो ही भारतातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा मानली जात असून तिचा कार्यरत वेग सुमारे 120 किलोमीटर प्रतितास आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
आज उत्तर प्रदेश समेत पूरा देश वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर के नए युग का साक्षी बन रहा है। मेरठ मेट्रो, नमो भारत ट्रेन और रीजनल रैपिड ट्रांजिट सिस्टम के नए सेक्शन के शुभारंभ से NCR के लोगों का जीवन और अधिक सरल, सुगम एवं सुविधाजनक बनेगा। https://t.co/gm42Tk3Y7c — Narendra Modi (@narendramodi) February 22, 2026
विशेष म्हणजे भारतात प्रथमच नमो भारत ट्रेन आणि मेट्रो सेवा एकाच आरआरटीएस ट्रॅकवर धावणार आहेत. 23 किलोमीटर लांबीच्या मेरठ मेट्रो मार्गावर मेरठ साऊथ, पार्टापूर, रिठानी, शताब्दी नगर, ब्रह्मपुरी, मेरठ सेंट्रल, भैसाली, बेगमपुल, एमईएस कॉलनी, दौरली, मेरठ नॉर्थ, मोदीपुरम आणि मोदीपुरम डेपो अशी एकूण 13 स्थानके विकसित करण्यात आली आहेत. मेरठ साऊथ, शताब्दी नगर, बेगमपुल आणि मोदीपुरम येथे प्रवाशांना मेट्रो आणि आरआरटीएस दरम्यान इंटरचेंज सुविधा उपलब्ध असेल.
देश में ये पहली बार हो रहा है… जब एक ही स्टेशन, एक ही ट्रैक पर नमो भारत और मेट्रो रेल चलेगी। यानी एक ही प्लेटफॉर्म से आप शहर के भीतर भी यात्रा कर पाएंगे और उसी स्टेशन से सीधे दिल्ली भी आ-जा सकते हैं: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) February 22, 2026
सराय काले खान स्थानकाला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यात आले असून ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, दिल्ली मेट्रोची पिंक लाईन, वीर हकीकत राय आयएसबीटी आणि रिंग रोडशी जोडले गेले आहे. स्मार्ट तिकीट व्हेंडिंग मशीन, क्यूआर कोड आधारित तिकीट प्रणाली आणि कॅशलेस प्रवास सुविधा यामुळे प्रवाशांना जलद व सुलभ प्रवास अनुभव मिळणार आहे. भविष्यात दिल्ली-अलवर आणि दिल्ली-कर्नाल जलद रेल्वे मार्गाशी जोडणी करण्यासाठी सहा प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात आली आहे.
नमो भारत ट्रेनची रचना बुलेट ट्रेनसारखी आधुनिक ठेवण्यात आली असून पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर कन्सोल, मोबाईल व लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, सन-प्रोटेक्शन ब्लाइंड्स, आरामदायी आसनव्यवस्था यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महिलांसाठी स्वतंत्र डबा, पुरेशी सामान ठेवण्याची जागा, पीक अवर्समध्ये अतिरिक्त उभे राहण्याची सुविधा तसेच बॉटल होल्डर, मॅगझिन रॅक आणि फूटरेस्टसारख्या सुविधांमुळे ही सेवा प्रवाशांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक प्रणाली ठरणार आहे.