नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी शनिवारी एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली हजारो नागरिकांना भीती दाखवून सुमारे 100 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे पाकिस्तानसह अनेक देशांपर्यंत पसरलेले असल्याचे तपासात समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांचे उपायुक्त विनीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीत आरोपी स्वतःला अँटी टेररिस्ट स्क्वॉड (ATS) अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना फोन करत होते. पीडितांचे मोबाईल नंबर पहलगाम हल्ला किंवा दिल्लीतील रेड फोर्ट स्फोटासारख्या दहशतवादी प्रकरणांशी जोडले असल्याचा खोटा आरोप केला जात होता. त्यानंतर तात्काळ अटकेची धमकी देत ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवल्याचा बनाव करून मोठ्या रकमा ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जात होते.
तपासात उघड झाले की या संपूर्ण नेटवर्कचे संचालन चीन, नेपाळ, कंबोडिया, तैवान आणि पाकिस्तानशी संबंधित आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार करत होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात जणांमध्ये एका तैवानच्या नागरिकाचाही समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी SIMBOX नावाच्या बेकायदेशीर उपकरणांचा वापर करत होते. या उपकरणांमुळे परदेशातून येणारे कॉल्स भारतीय लोकल नंबरप्रमाणे दिसत होते, ज्यामुळे पीडितांचा विश्वास बसत होता.
फसवणूक अधिक गुप्त ठेवण्यासाठी आरोपी 2G नेटवर्कचा वापर करत होते, जेणेकरून रिअल-टाइम ट्रॅकिंग कठीण व्हावे. SIMBOX मधील IMEI नंबर सतत बदलले जात असल्याने एकाच नंबरवरून वेगवेगळ्या शहरांतून कॉल येत असल्याचे भासवले जात होते. पहिला SIMBOX दक्षिण-पश्चिम दिल्लीतील गॉयला डेअरी परिसरात सापडला, त्यानंतर महिनाभराच्या गोपनीय पाळतीनंतर दिल्लीतील चार ठिकाणांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत शशि प्रसाद आणि परविंदर सिंह यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात पंजाबमधील मोहाली येथे आणखी एक SIMBOX हब सापडला, जिथून सरबदीप सिंह आणि जसप्रीत कौर यांना अटक झाली. हे दोघे यापूर्वी कंबोडियातील स्कॅम कॉल सेंटर्समध्ये काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, एका पाकिस्तानी हँडलरकडून या रॅकेटला आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की हा संपूर्ण प्रकार अत्यंत संघटित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होता. क्रिप्टोकरन्सीद्वारे मनी लॉन्ड्रिंग, आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि इतर गुन्हेगारांच्या सहभागाचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या धमक्यांना बळी न पडता तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.