नवी दिल्ली: लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटाच्या ठिकाणाहून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (Forensic Science Laboratory – FSL) च्या पथकाने तब्बल 40 हून अधिक नमुने गोळा केले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान दोन कारतूस, त्यापैकी एक जिवंत तसेच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विस्फोटकांचे नमुने हस्तगत करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात या स्फोटकांपैकी एक अमोनियम नायट्रेट (Ammonium Nitrate) असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे सोमवारीच फरीदाबाद येथे तपासादरम्यान 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणात अल फलाह विद्यापीठ (Al Falah University) शी संबंधित डॉ. मुझम्मिल गनी आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दुसरे स्फोटक अमोनियम नायट्रेटपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे दिसते. त्याचे अचूक स्वरूप फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी च्या सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल. लाल किल्ल्याजवळील स्फोटस्थळावरून गोळा केलेले नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासले जात असून, FSL च्या तज्ज्ञ पथकाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या भीषण स्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जखमी झाले होते. लाल किल्ल्याच्या सिग्नलजवळ उभी असलेली एका छोट्या वाहनात (Hyundai i20) क्षणार्धात स्फोट झाला.
तपासात असे स्पष्ट झाले आहे की वाहनात सुमारे 80 किलो स्फोटक भरलेले होते, मात्र डेटोनेटर (Detonator) किंवा वेळ नियंत्रक उपकरण सापडले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)’ नंतर सक्रिय झालेला फरीदाबाद दहशतवादी गट (Terror Module) या घटनेमागे असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मालिकाबद्ध स्फोटांची (Serial Blasts) योजना तयार करण्यात आली होती. पण फरीदाबादमधील साथीदारांच्या अटकेनंतर मुख्य सूत्रधार डॉ. उमर घाबरला आणि दबावाखाली स्वतःच स्फोट घडवून आणला.
पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमर आपल्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत होता, मात्र तपासाच्या दबावाखाली त्याने घाईघाईत स्फोट केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency – NIA) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे.