मुंबई : भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. मनीष निकोसे नावाच्या इसमाने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना आज पुन्हा एकदा धमकी दिली असल्याची माहिती आमदार लाड यांनी दिली आहे.
मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने 2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन असे या धमकीत म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले आहे. तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे हा व्यक्ती सांगत आहे.
सदर इसमाची कसून चौकशी करून त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा व त्यास अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कोण आहेत प्रसाद लाड
प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार आहेत. जून 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काही मते फुटल्याने भाजपाला त्याचा फायदा झाला. त्याचवेळी भाजपा उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. सध्या ते विधान परिषदेचे आमदार म्हणून काम पाहत आहेत.