उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात ‘जय गुजरात’ची घोषणा

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात ‘जय गुजरात’ची घोषणा

पुणे: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर येताच राज्यभरात खळबळ उडाली. शुक्रवारी पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे कौतुक केले. अमित शहा यांचे कौतुक करताना एकनाथ शिंदे यांनी अनेक विशेषणे आणि उपमा वापरली होती. मात्र, भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'. एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, एकनाथ शिंदेंनी कधीच त्यांच्या भाषणात असं म्हटलं नाही. त्यामुळे, शुक्रवारी एकनाथ शिंदेंना 'जय गुजरात' म्हणण्याची कल्पना नेमकी कशी सुचली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचा टीझर लाँच

सुषमा अंधारेंची संतप्त प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर सुषमा अंधारे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली की, 'मला त्याचे आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतल्यानंतर आणि दिल्लीकरांच्या पायावर महाराष्ट्राची अस्मिता बळी दिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे.  त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसे? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झाले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे'. 

पुढे सुषमा अंधारें म्हणाल्या, 'या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की, जिथे राज्याचा मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जय गुजरात म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या? हा उन्नतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक आहे. जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसा वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे'. 

शिंदे बरळले अन् आव्हाड डिवचले 

एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंना डिवचत म्हणाले, 'आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब?'. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावंस वाटतं आणि ते म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी'. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number