नागपूर: देशात एकीकडे कोरोनाचं संकट असतानाच दुसरीकडे लसीकरणालादेखील सुरुवात झाली. त्यांनंतर लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यास परवानगी मिळाल्यावर आता नागपूरमध्ये लहान मुलांवर कोवॅक्सीन लसीची चाचणी केली जाणार आहे.
देशात सध्या फक्त तीनच ठिकाणी या चाचणीला परवानगी देण्यात आली असून त्यामध्ये नागपूरच्या मेडिट्रीना रुग्णालयाचादेखील समावेश आहे. डॅा. वसंत खळतकर हे मुलांच्या चाचणीचे प्रमुख असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरण चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. इथीकल कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर स्वयंसेवक मुलांची नोंदणी होणार आहे.
यामध्ये २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची होणार चाचणी होणार असून २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन गटात ही चाचणी होणार आहे.
तसेच चाचणीपूर्वी मुलांच्या पालकांची परवानगी घेतली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येईल. साधारणतः सहा ते सात महिने ही लसीची चाचणी चालणार आहे.