कोरोना परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांचे लसीकरण करण्यास भर दिली आहे. सध्या १८ वर्षाच्या पुढील प्रत्येकाचे लसीकरण होत आहे. मात्र अशातच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने डोकं वर काढले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. तसेच आजपासून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळादेखील नियमाचे पालन करत सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता लवकरच तीन वर्षांवरील चिमुकल्यांना लवकरच कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनाची ‘कोवाव्हॅक्स’ ही लस येणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोवाव्हॅक्स लस विकसित करणार असल्याची, माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.
अदर पुनावाला मंगळवारी सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. सध्या तीन आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी कोवाव्हॅक्स लसीची चाचणी सुरू आहे. कोवाव्हॅक्स ही यूएस-आधारित नोव्हावॅक्सच्या कोविड लसीचे व्हर्जन आहे, अशी माहिती पुनावाला यांनी दिली आहे.