दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबईत जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची उद्या तपासणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
कोरोना विषाणूमुळे देशात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यानंतर आता कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात शिथिलता येत आहे. मात्र अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची खबरदारी घेण्यात यावी, असेही केंद्राने राज्यसरकारला सुचवले आहे.
ओमिक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरीकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. तसेच लसीच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी युनिव्हर्सल पास ग्राह्य धरला जाणार आहे.