हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांकडून काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोमवारी एका वृत्तवाहिनवरील चर्चासत्रातून बाहेर पडल्यानंतर हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना शिवीगाळ केली तसेच काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पिस्तुल देखील दाखवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला आहे.
दरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांच्यावर आधी हात उगारले आहे. या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले असून घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुषार दामगुडे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.