कर्नाटकातील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला भेटण्यासाठी थेट दिल्ली गाठली आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा वद पेटला असून राजकीयवर्तूळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांचे निकटवर्तीय, मंत्री एन. चालुवर्यस्वामी आणि आमदार इक्बाल हुसेन, एच.सी. बालकृष्ण, एस.आर. श्रीनिवास आणि टी.डी. राजेगौडा हे दिल्लीत पोहोचले असून लवकरच ते पक्षाच्या हायकमांडला भेटणार आहेत.
यामगचं कारण असं की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने अडीच वर्षे पूर्ण केले आहेत आणि त्यांच्यात झालेल्या करारानुसार शिवकुमार यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी डीके शिवकुमार गटाने केली आहे. यासाठीच डीके शिवकुमार यांचे समर्थक आमदार टीडी राजेगौडा यांनी काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांची भेट घेतली. तसेच दिल्लीत आलेले सर्व नेते या करारावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतील.
दरम्यान या प्रकरणावर गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू ग्रामीणचे माजी लोकसभा खासदार आणि डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचे अडीच वर्षांचे वचन पूर्ण करतील, त्यांनी म्हटल होत की, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळात फेरबदल प्रस्तावित आहे. ते पुढील वर्षी त्यांचे विक्रमी 17 वे अर्थसंकल्प सादर करतील."
तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, "माझी सत्ता आता आणि भविष्यातही सुरक्षित आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. जर मी चामराजनगरला आलो तर माझी सत्ता जाईल ही एक अंधश्रद्धा आहे. मी चामराजनगरला जातो कारण मी अंधश्रद्धा आणि अफवांवर विश्वास ठेवत नाही. मी राज्यातील सर्व जिल्ह्यांना समान मानतो आणि सर्व जिल्ह्यांना भेट देतो. ही एक अनावश्यक चर्चा आहे. अडीच वर्षांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा झाल्यानंतरच मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पक्षाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेणे आवश्यक आहे. एकूण ३४ मंत्रिपदे आहेत, त्यापैकी दोन रिक्त आहेत. ही रिक्त मंत्रिपदे मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान भरली जातील."