मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने  श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number