आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.
पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी केलं. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.