कांदा मार्केटमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा 2-3 रुपये किलोने विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर थेट मार्केटच्या गेटमध्ये उभे केले. त्यानंतर ट्रॉलीतील कांदे गेटवर फेकून देत कांद्याच्या ढिगाऱ्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. इतकचं नव्हे तर कांद्याचे दर, निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे अनुदान आणि शेती पिकांच्या खर्चाचा योग्य मोबदला यांसह इतर मागण्यांसाठी कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
कांद्यासाठी हमीभाव तातडीने लागू करुन प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता. या प्रकारामुळे कांदा मार्केटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दर कोसळल्याने हतबल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साताऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
यादरम्यान फडणवीस म्हणाले की, "मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता 12 रुपये 35 पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. याचदरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोर कांदा फेकून रोष व्यक्त केला होता. त्यामुळे मी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे ही विनंती केली होती."
साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा खरेदीची घोषणा केली.