मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची 12 वर्ष पूर्ण केली असून या निमित्ताने आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 4 हजार 398 दिवस हा लाँगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडीत काढला, असा उल्लेख मोदी यांचा केला. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारकिर्द लांब आहे, यासाठी महत्त्वाची नाही तर जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे. एनडीए सर्वात मोठा समूह म्हणून 22 राज्यात सरकार चालवत आहे. देशाच्या 80 टक्के भूभागावर एनडीए शासित राज्य सरकार आहेत. काँग्रेसला यश मिळालं नव्हतं, त्याहून अधिक एनडीएला प्राप्त झालं आहे. पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा या दशकातील चमत्कार आहे. शिवाय मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे, तर फायनेस्ट पंतप्रधान आहे. असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एल निनो, शेतकरी कर्जमाफी या विषयांवरही भाष्य केले. शेतकरी कर्जमाफीत अट का टाकली, या बद्दल खुलासा केला. फडणवीस म्हणाले की, शेती समोरची आव्हानं कमी नाहीत. निसर्गाच सर्वात मोठं आव्हान शेतीसमोर आहे. क्लायमेट प्रूव्ह शेती करावी लागेल. दुसरं ही जी काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीत कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट टाकलेली आहे, ती विशेषत: महाराष्ट्रातली बँकिंग सिस्टिम आहे. त्यात आमच्या जिल्हा सहकारी बँका आहेत. त्या टिकल्या पाहिजेत यासाठी ही टाकलेली अट आहे. ज्यात ज्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे. त्यांच्याकरता यावेळेसही माफी करणार आहेत. एका फिक्स रक्कमेपर्यंत माफी देणार आहोत. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अन्यथा आपली बँकिंग सिस्टिम उद्ध्वस्त होईल. साधारणत: 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी एक सब कमिटी तयार केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्री त्यात आहेत. कर्जमाफी जशी पुढे जाईल, तशा त्यातल्या अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या कमिटीला देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.