Viral Crime Video: थरकाप उडवणारा व्हिडिओ; भाजप मंत्र्याच्या ‘खास’ माणसाकडून दगडाने ठेचून मारहाण; अंबादास दानवेंनी केला पर्दाफाश

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि थेट मंत्र्यांच्या खास माणसाचे नाव जोडले गेल्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Viral Crime Video: थरकाप उडवणारा व्हिडिओ; भाजप मंत्र्याच्या ‘खास’ माणसाकडून दगडाने ठेचून मारहाण; अंबादास दानवेंनी केला पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगरमधून क्रूरतेचा कळस गाठणारा एक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या ‘X’ काऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका व्यक्तीला जमिनीवर पाडून अत्यंत निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, एक व्यक्ती चक्क मोठ्या दगडाने पीडितावर प्रहार करत असल्याचे पाहून पाहणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडत आहे.

हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असल्याचे समजते, मात्र दानवे यांनी तो आता उजेडात आणला आहे. व्हिडिओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती ही भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा अत्यंत जवळचा मानला जाणारा माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे असल्याचे सांगितले जात आहे. तर मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अशोक कुलकर्णी असल्याचे समोर आले आहे. या घटनेवर संताप व्यक्त करताना दानवे यांनी सत्तेच्या माजात गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हेही वाचा: Pune Election 2026: पुणे शहरासाठी अजित पवारांनी मांडली विकासाची पंचसुत्री; म्हणाले खड्डेमुक्त रस्ते ते हायटेक रुग्णालये…

या घटनेवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी थेट सत्तेत बसलेल्या नेत्यांना सवाल केला आहे. दानवे यांनी ‘X’ वर लिहिले की, “क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय… पण मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला?”

दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे सत्ताधाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटले की, “ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवाभाऊ?” या विधानाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दामू शिंदे याने अशोक कुलकर्णी यांना यापूर्वी देखील दोन वेळा मारहाण केली होती. मात्र, तिसऱ्या वेळी करण्यात आलेली ही मारहाण अत्यंत जीवघेणी आणि क्रूर होती. ज्या पद्धतीने दगडाने हल्ला करण्यात आला, त्यावरून पीडित व्यक्ती जिवंत आहे की नाही, याबाबतही दानवे यांनी शंका उपस्थित केली आहे. या व्हिडिओमुळे आता जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि थेट मंत्र्यांच्या खास माणसाचे नाव जोडले गेल्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजप या प्रकरणावर काय स्पष्टीकरण देते आणि विरोधक या मुद्द्यावरून सरकारला कसे धारेवर धरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: IND Vs NZ Cricket Match: दुखापतीचे ग्रहण संपेना; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number