उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत असताना भाजपने मात्र नकार दिला असल्याची माहिती समोर आली. राज्यसभेसाठी पाठवायचं असेल तर समीर भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात यावं या भुजबळांच्या प्रस्तावालाच भाजपने नकार दिला असल्याची सूत्रांकडून माहिती आहे. दरम्यान प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन यांना राज्यसभेची संधी मिळाली असल्याची देखील चर्चा सुरु आहे.
राजेंद्र जैन यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून विधान परिषदेचे बारा वर्षे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केले असून मध्यवर्ती बँक आणि फेडरेशन मध्ये देखील त्यांनी अनेक काम केलेली आहेत. विदर्भाचा राष्ट्रवादीचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख आहे. तर राष्ट्रवादीतील या राजकीय खेळीने छगन भुजबळ नाराज झाल्याचं दिसून आलं. इतरांच्या लेकराबाळांना जो न्याय तोच मलाही मिळायला हवा, असे भुजबळांनी म्हटलं.
यावेळी छगन भुजबळांनी म्हटलं की, “माझा प्रस्ताव भाजपकडे मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एक दिवसच उरला होता. त्यावर भाजपकडून असं उत्तर आलं की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा समीर भुजबळ यांचा विचार करु. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्य नाही. मी नाराज नाही, काय नाराज होणार? इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती.” भुजबळांच्या या वक्तव्यानंतर
भुजबळांनी केलेल्या वक्तव्याबाबत तटकरेंना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तटकरेंनी यावर सूचक विधान केलं आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “भुजबळ हे आक्रमक नेतृत्व आहे.. त्यांच आजच वक्तव्य आक्रमक नव्हतं.. भुजबळ कब्बडी आणि बुद्धिबळाचे खेळाडू आहेत.. त्यांचं माझ्याबद्दल वक्तव्य असेल असे वाटत नाही.. मी, माझी मुलगी आणि आता अनिकेत सुद्धा निवडून आले आहेत… कुठलाही राजकीय पक्ष सर्वांचं समाधान करू शकत नाही.. बैठकीचा निर्णय झाल्यानंतर पत्रकारांसोबत चर्चा करताना भुजबळ साहेब पण आमच्यासोबत होते.. प्रत्येकाची योग्य वेळ येईल… छगन भुजबळ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिले आहेत, त्यांचे काम, योगदान मोठे आहेच त्यांचा मानसन्मान, त्यांना अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी घडत आल्या आहेत, यापुढेही घडत राहतील. मी लवकरच त्याविषयीही चर्चा सुद्धा करेल…” असं म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.