राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा झाली. तर वरिष्ठ नेत्यांची आता थोड्याच वेळात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार थोड्याच वेळात निश्चित केला जाणार आहे.
त्यापूर्वी राष्ट्रवादीतील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अशातच मंत्री छगन भुजबळांनी राज्यसभेवर जायचं असेल तर वरिष्ठ नेत्यांकडे त्यांची एक अट मान्य करण्याची मागणी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीकडे असलेल्या एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ योग्य त्यांनाच संधी देण्यात यावी असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः जवळ असलेल मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्यात आलं तरच राज्यसभेवर जाईन अशी अट पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवली असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कडे असलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा सुद्धा इच्छुक असल्याने राणा दाम्पत्य सुद्धा राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.
मात्र राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच उमेदवार असून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी कडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचं मंत्री पद आणि राज्यसभेवर पक्ष कोणाला पाठवणार यावर राष्ट्रवादीच्या कोर कमिटी बैठकीतच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाला मिळणार? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.