नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागावर आपला विजय निश्चित केला आहे. तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत एकट्या भाजपाने 132 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच होणार अशी सर्वत्र चर्चा आहे. बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने वक्तव्य केले आहे. संख्याबळानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच होणं स्वाभाविक आहे असे छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले आहे.
भाजपाचा मुख्यमंत्री स्वाभाविक
छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तीन पक्ष एकत्र काम करतात तेव्हा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. काही वेळेस मुख्यमंत्री होण्यासाठी महिना लागला आहे. त्यासमोर हा कालावधी कमी आहे. 2 ते 4 दिवसात शपथविधीचा कार्यक्रम असे भुजबळ यांनी म्हटले आहे. महायुतीत भाजपाला बहुमत असल्याने भाजपाचा मुख्यमंत्री होणे स्वाभाविकच असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.
ईव्हीएममध्ये गडबड तर मत कमी कशी ?
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे अपयश मिळाले. या अपयशाने भांबावून गेलेल्या मविआने ईव्हीएम मशीनवर संशय घेण्यास सुरूवात केली. जर ईव्हीएमध्ये गडबड असती तर माझी मत 56 , 57 हजारांच्या लीडने होती. ती १ लाखांवर जायला हवी होती. जरांगेमुळे काही वर्गाची मते मिळाली नाहीत. ईव्हीएममध्ये अडचण असती तर माझे मताधिक्य वाढले असते. कमी झाले नसते. लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते आणि विधानसभेला गडबड झाली का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कोणच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं म्हणून कारणे शोधावी लागतात अशी जोरदार टीका भुजबळांनी महाविकास आघाडीवर केली आहे.