Raj Thackeray : ‘मंत्र्यांच्याच मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स तपासा…’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, पंतप्रधान मोदींनाही दिला ‘हा’ सल्ला

राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत जिव्हारी लागणारी टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Raj Thackeray :  ‘मंत्र्यांच्याच मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स तपासा…’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, पंतप्रधान मोदींनाही दिला ‘हा’ सल्ला

Raj Thackeray :   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत जिव्हारी लागणारी टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आजच्या ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीची विचारसरणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेता जुनाट दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लहानपणी डोक्याला तेल लावल्याने बुद्धी वाढते असा समज असतो, पण आयुष्यभर तेल चोपडूनही काहींना सुबुद्धी सुचत नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. आंदोलनातील दगडांवरील ‘फिंगरप्रिंट्स’ थेट आधारकार्डशी जोडण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेताना, “मला आधी यांच्याच मेंदूवरचे ठसे तपासावे वाटतात,” अशी टोलेबाजी राज यांनी केली. कोल्हापूरकरांनी ज्यांना ज्ञानाच्या शोधात शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पाठवले, तिथे जाऊनही काहीच बदल झाला नाही, असे म्हणत अशा मंत्र्यांमुळेच आजचा तरुण वैतागला असल्याचे ते म्हणाले.

“दुसऱ्यांनाही आई असते, हे स्वपक्षीय ट्रोलर्सना समजावा”; PM मोदींना थेट सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका व्हिडिओ संदेशाद्वारे आंदोलक तरुणांनी त्यांच्या आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल वापरलेल्या अपशब्दांवर खंत व्यक्त केली होती. यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या मताशी पूर्ण सहमती दर्शवली. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा त्याच्या आईबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलणे पूर्णपणे चुकीचेच आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, यासोबतच त्यांनी पंतप्रधानांना स्वतःच्या पक्षाच्या वर्तुळाकडे पाहण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – Raj Thackeray : टोकाचं पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची माफी कोण मागेल?, थेट मोदींना सवाल

गेल्या 12 वर्षांत देशात आणि महाराष्ट्रात विरोधक, थोर नेते जसे की महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी तसेच कलाकारांना ज्या भाषेत ट्रोल केले जाते, ती संस्कृती कोणी सुरू केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपने सर्वत्र बसवलेली ट्रोल आर्मी कोणत्या पातळीवर जाऊन टीका करते, याकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न त्यांनी केला. “तुम्ही जे पेरले, तेच आज उगवून समोर येत आहे. दुसऱ्यांनाही आई असते आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे, हा धडा आधी पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आणि ट्रोलर्सना शिकवावा,” असा थेट आणि घणाघाती सल्ला राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा अधिकच रंगला असून, राजकीय भाषेचा दर्जा आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number