निवडणूक म्हटलं की मतमोजणीच्या दिवशी वातावरणात कमालीची धाकधूक असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपालिकेच्या निकालाचा सस्पेन्स अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच संपल्याचे चित्र दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निकालाची औपचारिकता न पाहता शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे मोठ बॅनर्स लावले आहेत.
"चाळीसगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा" अशा मजकुराचे हे बॅनर्स सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहेत. चाळीसगावची ही लढत केवळ एका नगरपालिकेची निवडणूक नसून ती दोन बलाढ्य राजकीय घराण्यांमधील 'अस्तित्वाची लढाई' मानली जात आहे. भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण या मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे या हाय-प्रोफाईल लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत निकाल हाती येण्यास अजून अवधी असतानाच शहराच्या मुख्य चौकाचौकात झळकलेले हे बॅनर्स पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा हा कमालीचा आत्मविश्वास आहे की त्यांच्याकडे असलेली एखादी खात्रीशीर अंतर्गत माहिती, याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. "निकालाची वाट न पाहता लोकशाहीचा अपमान केला जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे, तर भाजप समर्थक विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या निवडणुकीत प्रचारादरम्यान विकासाच्या मुद्द्यांसोबतच भावनिक आवाहनही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा एकीकडे, तर दुसरीकडे दिवंगत राजीव देशमुख यांच्याबद्दल असलेली जनतेमधील सहानुभूती दुसरीकडे, अशा कात्रीत चाळीसगावचा मतदार अडकला होता. आता या संघर्षात मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, याचा अधिकृत निकाल काही तासांतच समोर येणार आहे.
राजकारणात निकालापूर्वी बॅनर्स लावणे ही तशी नवी गोष्ट नाही, मात्र चाळीसगावसारख्या अटीतटीच्या लढतीत असा प्रकार घडल्याने वातावरणात अधिकच तणाव निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांचा हा आत्मविश्वास खरा ठरणार की मतमोजणीत एखादा अनपेक्षित उलटफेर होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तोपर्यंत, शहरातील हे बॅनर्स मात्र येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.