नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सप्टेंबर महिन्यात ऐन गणेशोत्सवात संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर असे पाच दिवस असेल. सतराव्या लोकसभेचे तेरावे सत्र आणि राज्यसभेचे २६१ वे सत्र होणार आहे. विशेष अधिवेशनात अमृत काळाशी संबंधित विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली.
दिल्लीत जी २० परिषद होणार आहे. ही परिषद ९ आणि १० सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. यानंतर आठ दिवसांनी संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर असे पाच दिवस असेल. यंदा हरितालिका तृतीया १८ सप्टेंबरला आणि १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गौरी पूजन २२ सप्टेंबरला होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
विशेष अधिवेशनात ‘या’ विषयांवर होणार चर्चा, सूत्रांची माहिती
संसदेच्या विशेष अधिवेशनात चांद्रयान – ३ मोहिमेचे यश, जी २० परिषद तसेच भारत सरकारच्या निवडक मोठ्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष अधिवेशनात निवडक विधेयके मंजुरीसाठी सादर होणार आहेत. यात एक देश, एक निवडणूक हे विधेयक असेल असे समजते. अधिवेशनाचा अजेंडा अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे संसदेत काय कामकाज होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.