उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला होता. यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंबद्दल वापरलेल्या अपशब्दांचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. जयकुमार गोरेंच्या समर्थकांकडून संजय राऊत यांचा निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक बॅनरला जोडो मारो आंदोलन करत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
यावेळी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध व्यक्त केला. शहरातील चार हुतात्मा चौकात राऊत यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवी दिली होती. दरम्यान त्यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात BNS कलम 356(2), 352 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.