मुंबई-पुणे महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांचा अपघात झाला आहे. एका खासगी कामाच्या निमित्ताने आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करत असताना दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला, हा अपघात इतका गंभीर होता की, त्यांच्या गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. प्राथमिक अंदाजानुसार गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे मानले जात आहे.
या अपघाताची नोंद करण्यात आली असून नेमका अपघात कसा झाला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उपचार सुर आहेत. यावेळी "मुंबई पुणे मार्गावर रात्री माझा अपघात झाला असला तरी काळजी करण्यासारखं काही नाही मी सुखरूप आहे त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे असे आवाहन राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे."
दिलीप धोत्रे हे सोलापुरचे असून मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या अपघाताची माहिती कळताच मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच राज ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली असून सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.