केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच जून महिन्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमिवर उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यामधील प्रतिनिधींना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी दोन्ही राज्यात भाजपची स्थिती चांगली असल्याचे दृष्य आहे. विशेषतः पंजाबमध्ये भाजप स्वबळावर आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तेथील काही प्रभावी नेत्यांना केंद्रात संधी दिली जाऊ शकते. याचपार्श्वभूमिवर पंजाबमधील भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा या दोन मोठ्या नेत्यांना पंजाबच्या कोट्यातून मंत्रीपद दिले जाऊ शकते.
आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील झालेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत युवक आणि आर्थिक विषयांवर आपली थेट भूमिका मांडली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी राघव चड्ढा यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता आहे. राघव चड्ढा यांचा चेहरा तरुणांसाठी प्रभावी चेहरा मानला जातो. त्यामुळे हे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते. एवढेच नव्हे तर त्यांच्यासह आम आदमी पक्षातील सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे तरुण चुग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. पक्ष संघटनेत दीर्घ अनुभव आणि विविध राज्यांतील जबाबदाऱ्या यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे.