शिर्डी साईबाबा संस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर हाय अलर्ट जारी; सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

शिर्डी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अशातच महाराष्ट्रातील एक प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे ही धमकी पाठवली असून, त्यानंतर शिर्डीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या ईमेलमध्ये साई मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली गेली आहे. त्यामुळे शिर्डी साई संस्थान तसेच स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांची कडेकोट तपासणी सुरू असून, प्रत्येक भाविकाची झडती घेतली जात आहे.

हेही वाचा:रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट; 5 तालुक्यांतील 14 हजाराहून अधिक ग्रामस्थांना फटका

पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला आहे. ईमेलचा स्त्रोत शोधण्याचं काम सायबर क्राइम विभाग करत आहे. ही धमकी केवळ खोडसाळपणातून आली आहे की त्यामागे एखादं कटकारस्थान आहे, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, मंदिर परिसरात बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक आणि अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून परिसरावर बारीक नजर ठेवली जात आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

शिर्डी पोलीस आणि संस्थान प्रशासनाने या धमकीबाबत सध्या अधिकृत माहिती देण्यास नकार दिला असला तरी, आतापर्यंतच्या माहितीवरून ही धमकी गंभीर स्वरूपाची मानली जात आहे. यापूर्वीही साईबाबा संस्थानला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु त्या खोट्या असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावेळी देशात वाढलेल्या दहशतवादी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही धमकी अधिक महत्त्वाची मानली जात आहे.

सध्या मंदिरातील दर्शन सुरळीत सुरू असून, भाविकांमध्ये थोडीफार भीती असली तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे वातावरण नियंत्रणात आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number