सोलापूर : कोविड काळापासून आपल्या सामाजिक कार्यासाठी चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूद हा राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच अभिनेता सोनू सूद यांनी सोलापूरात याबद्दल संकेत दिले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना सोनू सूद म्हणाले की, मला खूप साऱ्या ऑफर्स आलेल्या आहेत. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षात मोठमोठ्या पदांसाठी मला ऑफर्स आलेल्या आहेत. राज्यसभेसाठी मला तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून ऑफर्स आलेल्या आहेत. मात्र त्यासाठी मी मानसिकरित्या तयार नव्हतो. कारण मी ज्या मार्गाने आणि ज्या पक्षांसोबत जाईन, त्याच पक्षाच्या रंगात रंगून जाईल. सध्या तरी कोणत्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले नाही. कारण लोकांशी जोडलं जायचंय, खूप काम करायचंय, तुम्हा सर्वांचे मनोरंजन करायचंय आणि त्यानंतर वेळ आली की, कोट-पॅन्ट घालून मी ही तिथे पोहोचेन, असं म्हणत दाक्षिणात्य अभिनेता जोसेफ विजय याच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी त्याने घातलेल्या कोट-पॅन्टवर अभिनेता सोनू सूदने अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. आगामी काळात पंजाब विधानासभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असल्याने सोनू सूद यांच्या राजकारणातील चर्चेला उधाण आलं आहे.
यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद यांची बहिण मालविका सूद काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि पक्षाचे पंजाब प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविका सूद यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रचारासाठी सोनू सूद यांनीदेखील सहभाग घेतला होता. मात्र मालविका सूद यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील वर्षात म्हणजेच 2027 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सोनू सूदला राजकारणात येण्यासाठी विचारणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.