मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत आता सर्वात मोठ्या घडामोडीला वेग आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा नवा 'किंग' कोण? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. 7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरले जातील, तर 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता होणाऱ्या विशेष सभेत मुंबईच्या नव्या प्रथम नागरिकाची घोषणा केली जाईल.
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, या सत्तेच्या सोपानात मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. सत्तावाटपाच्या सूत्रानुसार, उपमहापौरपद आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'सुधार समिती'चे अध्यक्षपद शिंदे गटाच्या पदरात पडणार आहे. यामुळे आगामी काळात पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असतील, याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे.
या वेळच्या उपमहापौर निवडीत 'महिला शक्ती'ला झुकते माप दिले जाण्याची दाट शक्यता आहे. उपमहापौरपदी महिलेची वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळाल्यापासून पक्षात दोन बड्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. अनुभवी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या शर्यतीत आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे, सुधार समितीचे अध्यक्षपद पुरुषांकडे सोपवले जाणार असून, त्या पदासाठी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या अनुभवी खांद्यावर जबाबदारी दिली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या दोन्ही नेत्यांचा पालिकेतील अनुभव दांडगा आहे. 2014 मध्ये तृष्णा विश्वासराव यांनी सभागृह नेत्या म्हणून पालिकेचे कामकाज प्रभावीपणे हाताळले होते. दुसरीकडे, यामिनी जाधव यांचे नाव 2014 मध्ये महापौरपदासाठी चर्चेत होते, मात्र त्यावेळी आरक्षण आणि राजकीय गणितांमुळे स्नेहल आंबेकर यांची निवड झाली होती. तेव्हा न मिळालेले दिलेले मानाचे पद यावेळी उपमहापौरपदाच्या रूपाने जाधव यांच्याकडे येते की विश्वासराव बाजी मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या या निवडणुका म्हणजे केवळ पदांची फेरबदल नसून, आगामी राजकीय दिशा ठरवणारी ही 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे. विशेष सभेच्या अवघ्या 15 मिनिटे आधीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा असल्याने, ऐनवेळी काय राजकीय नाट्य घडते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तेच्या या सारीपाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता मास्टरस्ट्रोक खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.