सिंधुदुर्ग: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election Results 2026) निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. मुंबईत भाजप-शिंदे गटाच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली असतानाच, आता भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मुंबईत दोन्ही भाऊ (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊनही काहीच करू शकले नाहीत, मग आता सत्ता का आली नाही? याचे कारण आधी स्वतःला विचारा,” अशा शब्दांत राणेंनी ठाकरेंच्या पराभवावर बोट ठेवले आहे. आज ते सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘महापौर आकाशातून पडणार का?’ राणेंचा खोचक सवाल
मुंबईचा महापौर शिवसेनेचाच (ठाकरे गट) होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे व्यक्त करत आहेत. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आता देवाची भाषा करू लागले आहेत, पण त्यांनी कधी देवाकडे हात जोडले आहेत का? संख्याबळ नसताना महापौर काय आकाशातून येईल का?” भाजपला 89 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या असून महायुतीने 114 चा बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. याउलट ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. ही आकडेवारी पाहता, उद्धव ठाकरे सध्या केवळ वास्तवापासून दूर असून पराभवामुळे ते डिप्रेशनमध्ये गेल्याचा दावाही राणेंनी केला.
महाराष्ट्रात महायुतीची लाट, ठाकरेंना ‘घरी बसण्याचा’ सल्ला
नारायण राणे यांनी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निकालांचा हवाला देत सांगितले की, 25 ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. “महाराष्ट्राच्या जनतेने ठाकरेंची साथ सोडली आहे, आता तरी त्यांनी राजकारणातून निवृत्त होऊन घरी बसावे,” असा जळजळीत सल्ला राणेंनी दिला. मुंबईचा गड राखण्यात अपयशी ठरलेले ठाकरे बंधू आता राज्यातील राजकारणात ‘बॅकफूट’वर गेल्याचे चित्र या निकालांनंतर स्पष्ट दिसत आहे.
जिल्हा परिषदेसाठी ‘महायुती’ सज्ज; जागावाटपाचा आकडा जाहीर
मुंबईच्या विजयानंतर आता राणेंचे लक्ष कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे. सिंधुदुर्गात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “आम्ही एकमताने जागावाटप पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या 31 जागांवर भाजप तर 19 जागांवर शिवसेना लढणार आहे. पंचायत समितीच्या 63 जागा भाजपकडे आणि 37 जागा शिवसेनेकडे असतील. अजित पवार गटाशी चर्चा करून त्यांनाही योग्य जागा देऊ,” अशी माहिती राणेंनी दिली.
विरोधक नावापुरतेच उरले; शंभर टक्के विजयाचा निर्धार
“वाद करायला आता महाराष्ट्रात विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत,” असे म्हणत राणेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला 100 टक्के यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेचा निकाल हा केवळ ट्रेलर असून जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर असेल, असा दावाही त्यांनी केला. उद्या सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करणार असून प्रचाराचा धडाका आता कोकणातही पाहायला मिळणार आहे.
नारायण राणे यांनी केलेल्या या टीकेमुळे ठाकरे गटात नेमकी काय खळबळ उडते आणि संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.