BMC Election 2026: BMC जागावाटपाचा ‘वर्षा’ पॅटर्न; 150 जागांवर एकमत, 77 जागांवरुन संघर्ष; मुंबईच्या राजकारणात आजची दुपार ठरणार निर्णायक

उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू असून, घराणेशाहीला विरोध करत सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे.

BMC Election 2026: BMC जागावाटपाचा ‘वर्षा’ पॅटर्न; 150 जागांवर एकमत, 77 जागांवरुन संघर्ष; मुंबईच्या राजकारणात आजची दुपार ठरणार निर्णायक

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी महायुतीमध्ये कमालीची हालचाल सुरू झाली आहे. जागावाटपाचा गुंता सोडवण्यासाठी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या खलबतांमध्ये 227 पैकी 150 जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची विश्वासार्ह माहिती समोर आली आहे. मात्र, उर्वरित 77 जागांवरून अद्यापही रस्सीखेच सुरू असून, या जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज पुन्हा एकदा बैठकांचे सत्र रंगणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीपूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र आढावा घेतला, त्यानंतरच संयुक्त चर्चेला सुरुवात करण्यात आली.

या बैठकीत प्रामुख्याने 'नातेवाईक आणि घराणेशाही' हा विषय चर्चेचा मुद्दा ठरला आहे. वडाळा, प्रभादेवी, चेंबूर, बोरीवली आणि अंधेरी यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकिटाचा आग्रह धरला आहे. या प्रवृत्तीवर भाजप आणि शिवसेनेच्या कोअर कमिटीने नाराजी दर्शवली आहे.

नातेवाईकांनाच महत्त्व दिल्यास पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि निवडणुकीत त्याचे विपरीत परिणाम उमटतील, अशी भीती नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नातेवाईकांऐवजी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी भर दिला आहे.

हेही वाचा: Shivsena – MNS Alliance : मुंबईवर ठाकरेंची मोहोर! उद्धव-राज युतीची अधिकृत घोषणा होणार? महापालिका निवडणुकीसाठी रणनिती आखणार

शिवसेनेने मुंबईतील आपल्या नेहमीच्या 'मराठी बालेकिल्ल्यांवर' विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दादर, परळ आणि लालबाग यांसारख्या मराठीबहुल पट्ट्यात शिवसेनेचा वरचष्मा असल्याने तिथे आपल्या पक्षालाच अधिक जागा मिळाव्यात, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लावून धरली आहे. येथील मराठी मतदार भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक पसंती देतील, अशी चर्चा शिवसेना नेत्यांनी या बैठकीत केला. या दाव्यामुळे काही प्रभागांमध्ये जागावाटपाचा पेच अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी दहा वाजता आपल्या 'नंदनवन' निवासस्थानी शिवसेनेच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. यात मुंबईतील उर्वरित 77 जागांवर पक्षाची अंतिम भूमिका ठरणार आहे. दुसरीकडे, महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट मुंबईत किती जागा लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आज दुपारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका स्पष्ट करतील.

मिळालेल्या माहितीनुसार, 77 पैकी 30 ते 35 जागांवरील वाद सोमवारी रात्रीच बैठकीत मिटवण्यात यश आले आहे. उर्वरित जागांवर आज दुपारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या दुपारपर्यंत महायुतीच्या सर्व 227 उमेदवारांची अंतिम यादी आणि जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीला जाताय? मग हे नियम नक्की वाचा, कार्ड मिळाल्यावर 'इतक्या' वेळात सुरू करावी लागेल यात्रा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number