BMC Election 2026: जागावाटपा गोंधळानंतर आठवले महायुतीच्या व्यासपीठावर, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. रिपाईने 13 जागांवर स्वबळावर उमेदवार दिले असतानाही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारात सहभागी झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

BMC Election 2026:  जागावाटपा गोंधळानंतर आठवले महायुतीच्या व्यासपीठावर, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (BMC Election 2026) पारा सध्या शिगेला पोहोचला असून, जागावाटपावरून महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेने आरपीआयला (आठवले गट) जागावाटपात नाममात्र स्थान दिल्याने पक्षात मोठी नाराजी असतानाच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी वरळीतील महायुतीच्या सभेला लावलेली हजेरी राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि संभ्रमाचा विषय ठरली आहे. स्वतःचे उमेदवार विरोधात उभे असतानाही आठवले महायुतीच्या मंचावर दिसल्याने अनेकांना विशेष वाटत आहे.

जागावाटपात ‘रिपाई’ची कोंडी; नेत्यांमध्ये संतापाची लाट

महायुतीच्या जागावाटपाच्या सुरुवातीच्या चर्चेत भाजप आणि शिवसेनेकडून रिपाईला प्रत्येकी सहा जागा देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष यादी जाहीर झाली तेव्हा रिपाईच्या पदरात निराशाच पडली. भाजपने एकही जागा सोडली नाही, तर शिवसेनेने केवळ एका जागेची तयारी दर्शवली. यामुळे आरपीआयच्या गोटात फसवणुकीची भावना निर्माण झाली असून, स्वाभिमान जपण्यासाठी पक्षाने मुंबईत 13 जागांवर स्वबळावर उमेदवार उतरवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

वरळीच्या सभेत आठवलेंची एन्ट्री; संभ्रम वाढला

वरळी हा आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असल्याने महायुतीने तेथून प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोफखाना धडाडत असताना, त्याच व्यासपीठावर रामदास आठवले यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. एकीकडे पक्षाचे 13 उमेदवार महायुतीच्या उमेदवारांसमोर निवडणूक लढवत आहेत आणि दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा महायुतीचा प्रचार करत आहेत, या विसंगतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

हेही वाचा: Apar ID: 'अपार' कामाचा 'अफाट' ताण! निवडणुकांच्या धामधुमीत शिक्षकांसमोर पाच लाख आयडी नोंदणीचे मोठे आव्हान

‘दोस्ती’ही निभावणार अन् ‘स्वबळ’ही आजमावणार!

रामदास आठवले यांची ही भूमिका ‘अचंबित’ करणारी असली, तरी त्यामागे एक वेगळे राजकीय समीकरण असल्याचे बोलले जात आहे. रिपाईने 13 जागांवर स्वतंत्र उमेदवार दिले असले, तरी उर्वरित जागांवर त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मित्रपक्षांनी दुर्लक्षित केल्यामुळे शक्तीप्रदर्शन म्हणून काही जागा लढवायच्या आणि सत्तेतील वाटा कायम ठेवण्यासाठी महायुतीचा प्रचारही करायचा, अशी ही दुहेरी चाल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

कार्यकर्त्यांची नाराजी की रणनीती?

रिपाईच्या नेत्यांनी उघडपणे भाजप-शिवसेनेवर टीका केली आहे. “आम्हाला खिजगणतीतही धरले गेले नाही,” असा आरोप पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे. असे असताना आठवले महायुतीच्या प्रचारात सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, “आम्ही महायुतीसोबतच आहोत, पण जागावाटपातील अन्यायामुळे काही ठिकाणी लढावे लागत आहे,” अशी सारवासारव पक्षाकडून केली जात आहे.

मुंबईच्या रणसंग्रामात ‘रिपाई’चा फॅक्टर ठरणार निर्णायक

मुंबई महापालिकेच्या या अटीतटीच्या लढाईत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत रामदास आठवलेंची ही ‘मिश्र’ भूमिका महायुतीला फायदेशीर ठरेल की 13 जागांवर रिपाईचे उमेदवार भाजप-शिवसेनेची मते खाऊन नुकसान करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीच्या नेत्यांनी आठवलेंना व्यासपीठावर स्थान देऊन मतांचे ध्रुवीकरण रोखण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्ष मतदानात त्याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: थंडी, धुके आणि प्रदूषणाचा विळखा; राज्यासाठी हवामान विभागाचा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number