मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या काही तासांनंतर मुंबईकर आपला कौल नोंदवणार आहेत. उद्या, 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून 227 प्रभागांसाठी मतदानाला सुरुवात होणार असून, 16 जानेवारीला या महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचा फैसला होणार आहे. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, सोशल मीडियावर ‘पोस्ट वॉर’ रंगला आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंचे एकत्र येणे. अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईच्या हितासाठी हातमिळवणी केली आहे. आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. “सर्व मराठी माणसांचं ठरलंय… एक आहे तर सेफ आहे! आणि ठाकरेच बेस्ट आहे,” असे लिहीत त्यांनी मुंबईकरांना साद घातली आहे. सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. “मुंबई कोणासमोर झुकणार नाही आणि ठाकरे बंधूंची ही युती विरोधकांचे मनसुबे उधळून लावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/JuzkMIMXHk — Sanjay Raut (@rautsanjay61) January 14, 2026
दुसरीकडे, भाजपनेही प्रचाराची धार वाढवली आहे. आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “हिंदूंच ठरलंय, I Love महादेवच…” अशी पोस्ट शेअर करत त्यांनी या निवडणुकीला धार्मिक आणि अस्मितेचे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
pic.twitter.com/6rrvAMeI9K — Nitesh Rane (@NiteshNRane) January 14, 2026
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकाचे यावेळचे बजेट खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. 15 जानेवारीला सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे पाच या वेळेत मतदान होणार असून, प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. शहरभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उद्याच्या मतदानात मुंबईकर ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्याला कौल देतात की ‘हिंदुत्वा’च्या राजकारणाला पसंती दर्शवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईची किल्ली कोणाच्या हाती जाणार, याचे स्पष्ट चित्र 16 जानेवारीला समोर येणार आहे.