मुंबई: मुंबई महापालिकेच्या रणमैदानात आता 'वडापाव' आणि 'नाश्त्या'चा काळ मागे पडला आहे. कार्यकर्त्यांची फौज टिकवून ठेवण्यासाठी आता उमेदवारांना 'फाईव्ह स्टार' सोयीसुविधा द्याव्या लागत आहेत. सकाळी चहा-नाश्त्यापासून सुरू झालेला हा पाहुणचार रात्रीच्या चमचमीत व्हेज-नॉनव्हेज जेवणापर्यंत पोहोचला आहे. निवडणुकीच्या या पंधरा दिवसांच्या काळात मुंबईतील केटरिंग व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असून, प्रत्येक उमेदवाराचा जेवणावळींवरील खर्च दिवसाला सरासरी 60 ते 70 हजार रुपयांच्या घरात गेला आहे.
सकाळचा नाश्ता ते रात्रीचा 'भरपेट' बेत
निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये सकाळी कार्यकर्त्यांची गर्दी जमते, तिथेच त्यांच्या नाश्त्याची सोय केली जाते. त्यानंतर प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या 150 ते 200 कार्यकर्त्यांसाठी दुपारी आणि रात्री चविष्ट भोजनाची व्यवस्था करणे अनिवार्य झाले आहे. केटरर्सना आता केवळ जेवण बनवून चालत नाही, तर स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांपासून ते हायजिनिक सर्व्हिसपर्यंत सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उमेदवारांसाठी ही केवळ 'सोय' नसून आपली ताकद दाखवण्याचे एक साधन बनले आहे.
केटरर्सना आले 'अच्छे दिन'
लग्नसराईच्या हंगामापेक्षाही निवडणुकीचा हा काळ केटरर्ससाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. कारण इथे ऑर्डर एका दिवसाची नसून सलग 15 ते 20 दिवसांची असते. "आधी लोक केवळ वडापाववर खुश असायचे, पण आता कार्यकर्त्यांना दोन्ही वेळेला पूर्ण जेवण हवे असते. त्यातही रविवारी किंवा महत्त्वाच्या सभेच्या दिवशी नॉनव्हेजची विशेष मागणी असते," असे एका स्थानिक केटररने सांगितले. मोठ्या सभांच्या वेळी तर हा आकडा हजारांच्या घरात जातो, ज्यामुळे केटरर्सना अतिरिक्त कामगार कामावर ठेवावे लागत आहेत.
राजकीय गणितात 'चवी'चे महत्त्व
कार्यकर्त्यांच्या उत्साहावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो, हे उमजलेल्या उमेदवारांनी आता 'केटरिंग मॅनेजमेंट'ला प्रचाराचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. ज्याचे जेवण चांगले, त्याचे कार्यकर्ते जास्त जोमाने घोषणा देतात, असे एक नवे समीकरण मुंबईच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता केवळ भाषणच नाही, तर केटरर्सच्या कढईतून निघणारा वाफाळलेला सुवासही निवडणुकीत 'विजयी' होण्यासाठी मदत करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.