मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक 2025 जवळ येत असताना भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सर्व्हेनुसार भाजपाला येणाऱ्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक आहेत. त्यामुळे विरोधकांच्या बालेकिल्ल्यांवरही भाजपने लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे आणि काँग्रेसच्या वॉर्डांमध्ये भाजपने चाचपणी सुरू केल्याचे समजते. मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा असून स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी 114 जागांची गरज असते.
भाजपच्या सर्व्हेत पक्षाला 100 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज दिसत असला तरी स्वबळावर सत्ता मिळवणे शक्य होणार नाही, हेच या अहवालातून स्पष्ट होत आहे. महायुतीसोबत लढल्यास भाजपाला अतिरिक्त लाभ होऊ शकतो, असा निष्कर्षही यात मांडण्यात आला आहे.
सर्व्हेमधील प्रमुख निरीक्षणे: शिवसेना ठाकरे गटाचे 38 माजी नगरसेवक आहेत, त्यापैकी 16 जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसच्या 31 माजी नगरसेवकांपैकी आठ जागा भाजपकडे झुकताना दिसत आहेत. काँग्रेसचे 10 नगरसेवक आता पक्षात नसल्याने या वॉर्डांमध्ये भाजपाला जास्त संधी आहे. भाजप आपल्या विद्यमान 82 जागा टिकवण्याची शक्यता असून शिवसेना आणि काँग्रेसकडून मिळणाऱ्या जागांसह भाजपाचा आकडा 100 ते 106 च्या आसपास पोहोचू शकतो.
तथापि, या आकड्यांनंतरही भाजप स्वबळावर सत्ता मिळवू शकणार नाही, हे सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ भाजपाला आवश्यक ठरणार आहे. आता महायुतीत जागावाटप कसे होणार आणि भाजप – शिंदे गटात अंतिम विजयी कोण होणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.