कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. याचाच गैरफायदा घेत रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे चित्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यात इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
शासकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयातून चोरी केलेली इंजेक्शन वाढीव दराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासह दोन मेडिकल चालकांना अटक करण्यात आली आहे. अनिल बोहते असे घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नाव असून मंदार भालेराव आणि अभिजीत तौर अशी दोन मेडिकल चालकांची नावे आहेत.
प्रत्येकी १५ हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. कुठल्याही प्रकारची प्रिस्क्रिप्शन नसताना इंजेक्शन वाढीव दराने विक्री करत काळाबाजार केला जात असल्याची महिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे.