एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारच्या या घोषणेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून तात्पुरती माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.
महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले पाहिजेत तसेच त्यांचे वेतनवाढही झाली पाहिजे, याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिन करा आणि त्यांना सरकारी घोषित करा, अशी मागणी करत आंदोलकांना चिथवण्याचे काम केले आहे, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
तसेच भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत त्यांना भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे तसेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि बोनस मिळणार असल्याची घोषणा केल्यामुळे कर्मचारी हळूहळू कामावर रुजू व्हायला सुरूवात होईल, हे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना कळले आहे. तसेच कर्मचाऱ्यांन सत्य काय आहे, हे कळल्यामुळे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, संपकारी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आता न्यायालयात पोहचली आहे. त्यासाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर एसटी महामंडळाच्या विलिनीकरण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.