या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली.
अश्विनी जगताप यांनी १,३५,४९४ मते मिळवली आहेत. नाना काटे ९४, ३४३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर, राहुल कलाटे ४४, ०८२ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ७७० मतांची आघाडी घेत लक्ष्मण जगतापांनंतर गड राखला आहे.
निकाल लागण्यापूर्वीच, मतमोजणीच्या वेळी आघाडीवर असताना अश्विनी जगताप यांनी, ‘ साहेब गेले असले तरी गड राखायचा होता. जनतेने गड राखला आहे.’ ‘हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि जनतेला समर्पित करते’, अशी प्रतिक्रिया दिली होती.
निकालानंतर, ‘राहुल कलाटेंमुळे आमचा पराभव झाला.’ ‘नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात मतांची फाटाफूट झाल्यामुळे राष्ट्रवादी पराभूत झाली’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यात रविवारी, २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी कसबा आणि चिंचवड विभागात पोट निवडणूक पार पडली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली होती.