महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मीठाचा खडा पडल्याचे दृष्य आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असताना देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेले पाहायला मिळाले. चेंबूरमध्ये दोन्ही उमेदवारांचा प्रचार करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या घोषणेवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे या वॉर्ड मध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना रंगला आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महानगपालिका निवडणुकांच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना महायुतीत मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काही नेत्यांचे आपापसातच नाराजीनाट्य आणि टीका-टिप्पणीचे खेळ पाहायला मिळत आहेत. अशातच आता यासर्व प्रकारामुळे भाजप आणि शिवसेनेच्या संबंधात आणि मैत्रीपूर्ण लढतीत याचा काय परिणाम होतो ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.