राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचेही दिसून येत आहे. तर, राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली.
ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली आहे.