जयेश सावंत, प्रतिनिधी
अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतमध्ये भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बहुमतात असलेल्या नगरपंचायतमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा विरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी देखील भाजपमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. भाजपच्या सोनाली नाईकवाडी आणि वैष्णवी धुमाळ या भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत सोनाली नाईकवाडी यांनी राष्ट्रवादी आणी शिवसेनेच्या मदतीने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना मोठा धक्का बसला असून भाजपमधीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी वैष्णवी धुमाळ यांचा पराभव केला. ही निवडणूक ३१ जुलै २०२६ रोजी पार पडली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीला केवळ सात महिने बाकी असताना भाजपचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. नगराध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या सोनाली नाईकवाडी आणी वैष्णवी धुमाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आणी पालिकेत विरोधक असलेल्या राष्ट्रवादी आणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांच्या बाजूने मत दिल्याने नाईकवाडी यांचा विजय झाला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला असून माजी आमदार वैभव पिचड यांना मोठा धक्का मानला जात असल्याचे सांगितले जात आहे.