मुंबई: वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार होता, मात्र ते कार्यक्रमस्थळी पोहोचताच पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी थेट त्यांच्या ताफ्यासमोर आपला संताप व्यक्त केला.
म्हात्रे यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपली कैफियत मांडणे सुरूच ठेवले.
पक्षातील जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त करताना निशिकांत म्हात्रे यांनी पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप केले. "वसईत जेव्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याची कोणाची हिंमत नव्हती, तेव्हापासून आम्ही रक्ताचे पाणी करून पक्ष जिवंत ठेवला. मात्र, आता तिकीट वाटप करताना निष्ठावंतांना विश्वासात न घेता, केवळ सात महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांना आणि चाळ माफियांना प्राधान्य दिले जात आहे," असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार स्नेहा दुबे यांच्यावरही निशाणा साधत त्यांनी कार्यकर्त्यांचा घात केल्याचे म्हटले.
आपल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देताना म्हात्रे भावूक झाले होते. 1980 पासून पक्षासाठी स्वतःला झोकून दिल्याचे सांगत ते म्हणाले की, "आणीबाणीच्या काळापासून आम्ही पक्षाचे काम करत आहोत. आज पक्षात नवीन लोक आले म्हणून जुन्यांची अडगळ झाली का? ज्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात उभे राहण्यास कुणी धजावत नव्हते, तेव्हा आम्ही 18 जणांनी पक्ष टिकवला. आम्हाला सत्तेची हाव नाही, पण ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले त्यांना साधे विचारातही घेतले जात नाही, हे दुर्दैवी आहे."
या संपूर्ण प्रकारामुळे वसई भाजपमधील अस्वस्थता, नाराजी आणि अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली असून, आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी ही घटना मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठ नेतृत्व ही नाराजी कशी हाताळते, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षात समन्वय साधला जातो का, की ही नाराजी आणखी वाढते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.