भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वात मोठी घडामोड घडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून ओळख असलेले शहजाद पूनावाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत भाजपाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या कार्यालयाकडूनही लवकरच या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजीनाम्याबाबतची स्पष्ट भूमिका काही वेळात समोर येण्याची शक्यता आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, पूनावाला यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत निवेदन प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्या निर्णयामागील नेमके कारण स्पष्ट होणार नाही. शहजाद पूनावाला हे गेल्या काही वर्षांत भाजपाचे आक्रमक आणि स्पष्टवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून प्रसिद्ध झाले होते. दूरचित्रवाणीवरील चर्चांमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली असून राष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
विशेष म्हणजे, भाजपात प्रवेश करण्यापूर्वी पूनावाला काँग्रेसशी संबंधित होते. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी दिली आणि ते भाजपाचा प्रमुख चेहरा बनले. आता त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पक्षाकडून आणि स्वतः शहजाद पूनावाला यांच्याकडून येणाऱ्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.