मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर दोघे भाऊ उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत त्या दोघांची संयुक्तित मुलाखत सामना ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला आहे. तब्बल 46 मि. 55 सेकंदाच्या या मुलाखतीत विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, मुंबईतील उद्योग शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मुंबईतील उद्योगधंदे शहराबाहेर नेण्याचा खटाटोप भाजप सरकार करत असून याबाबत राज ठाकरे म्हणाले की, मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्यातील राज्यकर्ते करत आहेत. तो धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जो यापूर्वी नव्हता. एमएमआर रिजन म्हणजे आपली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये वाढवण बंदराला लागून विमानतळाची गरज काय. नुकतचं नवी मुंबई विमानतळ झालंय. आताच्या विमानतळाचा संपूर्ण कार्गो तिकडे देणार. हळूहळू करत मुंबईतील डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळही नवी मुंबईकडे वळवणार. आताचं विमानतळ हे अदानीकडे आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला वळवायचं आणि मुंबईतील विमानतळाचा सगळा भाग परत विकायला काढायचा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचं हे सगळं होतयं.
अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक बघायचा झाला तर नरेंद्र मोदी मोठे होण्याच्या आधीपासून अंबानी मोठे होते. पण अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यावरच झाला आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हाच अदानीला मुंद्रा पोर्ट मिळालेला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. मला भाजपला एकच गोष्ट विचारायची आहे. जर काँग्रेसची केंद्रात सत्ता असती आणि त्यांनी एकाच उद्योजकावर मेहरबानी केली असती तर भाजपनं काय केलं असतं. त्यामुळे आज हे होताना भाजपची लोकं हवालदिल का आहेत. कारण त्यांच्या हातात काहीच नाहीत. ही सगळी बसवलेली माणसं आहेत. यात जे बसलेले होते. त्यांना नष्ट केलं गेलं. उदा. शिवराज चव्हाण, नितीन गडकरी आणि बरेच काही. पहिल्यांदा कोणत्यातरी राज्याचा मुख्यमंत्री केंद्रात पंतप्रधान झाला आहे. ज्याप्रकारे मुंबई रिजनवर त्यांचं लक्ष आहे, हे गेल्या 50 वर्षात घडलं नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे.