विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकला असून अध्यक्षांसह उपाध्यक्षपदीदेखील भाजपचा उमेदवार विराजमान झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड करण्यात आली. मात्र या निर्णयामुळे महायुतीत फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर शिंदे सेनेने बहिष्कार टाकल्याने यांची या निर्णयाला असहमती असल्याचे दिसून आले. तसेच ठाकरे सेनेनेदेखील या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. अध्यक्षपदासाठी बहुमताचा आकडा ३२ असणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे 23, शिवसेनेकडे 21, राष्ट्रवादीकडे 4 तर ठाकरे सेनेकडे 9 आणि राष्ट्रवादी (श.प.) गटाकडे एक जागा होती.
दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विकासामुळे देश आणि राज्य प्रगतीपथावर जात आहे. गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असावी यासाठी मोठ्या बहुमताने महाराष्ट्रात भाजपा निवडून आलेली आहे. वरिष्ठांच्या विकासाच्या कामामुळेच मी अध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे. तटस्थ राहून कुठल्याही पक्षाने बहिष्कार टाकला असं म्हणता येणार नाही तर त्यांनी एक प्रकारे आम्हाला मदतच केली, आमचा बहुमताचा आकडा पूर्ण झाला होता. त्यामुळे बाकी पक्ष या ठिकाणी आले नाही.
या निवडणुकीबाबत मंत्री अतुल सावे म्हणाले की, भाजप शिवसेनेची युतीची बैठक झाली. त्या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाठ आणि त्यांचे आमदार उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती, अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष त्याच पद्धतीने पुढच्या अडीच वर्षात शिवसेनेचा अध्यक्ष भाजपाचा उपाध्यक्ष असे ठरले होते. पण अचानक काय झालं मला माहिती नाही. तीन दिवसा अगोदर असं माहीत झालं की ते आमच्या पुरस्कृत उमेदवारांना फोन करून सांगत होते. आपण वेगळं सरकार बनवणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत याच पद्धतीने अपक्ष उमेदवारांना देखील त्यांनी फोन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने आमच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. तरी देखील शिवसेना त्यांना फोन करत होती. मी या संदर्भात पालकमंत्र्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी मला काहीच माहिती नाही, असे सांगितले. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ते दुसऱ्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आम्ही आमचे गणित जुळवायला सुरुवात केली. आमचे 23 आणि 2 पुरस्कृत सदस्य होते. तर एका उमेदवाराने आमच्याकडे प्रवेश केला होता. तर दुसऱ्या उमेदवाराने पाठिंब्याचे पत्र दिले होते. त्यानुसार 27 मतांचे आमचे गणित होते. यामध्ये राष्ट्रवादीचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे एकच सदस्य आम्हाला बहुमतासाठी पाहिजे होता. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेऊन देखील त्यांच्या लक्षात आलं की आपलं गणित बसत नाही. त्यांचं दुर्भाग्य असं की जे ठाकरे गटाचे लोक सोबत घेऊन गेले होते. त्यातले काही लोक पळून गेले. त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे होते. आम्ही त्यांना उपाध्यक्ष पद देणार होतो ते त्यांनी घ्यायला पाहिजे होते. आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली. ते आले नाही त्यांनी आम्हाला कॉल केला नाही, संपर्कही केला नाही. त्यांना सकाळपर्यंत आशा होती की आपले गणित जमलेले आहे आणि ते त्याच अतिआत्मविश्वासात राहिले. दोन आमदारांना त्यांच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचे होते. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना मिसगाईड केले. पण तो आकडा त्यांना जमवता आला नाही. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आला.