मराठी आणि इंग्रजी भाषेत समर्थपणे लिखाण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचं गुरूवारी मंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. नगरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साठोत्तरीच्या दशकातील मुंबईकरांचं निम्नमध्यमवर्गीय आयुष्य नगरकर यांनी इंग्रजी साहित्यातून ताकदीने मांडली. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही आपली पहिली कादंबरी त्यांनी मराठी भाषेत लिहिली होती. मराठी साहित्य विश्वात ही कादंबरी आपल्या नैसर्गिक बाजामुळे गाजली. आज ही कादंबरी नवमराठी साहित्यातील एक क्लासिक मानली जाते.
पुढील काळात मात्र त्यांनी इंग्रजीत लिखाण केलं. इंग्रजी साहित्यविश्वात ‘रावण आँड एडी’, ‘द एक्स्ट्राज’, ‘ककल्ड’, यांसारख्या कादंबऱ्या, कथा, नाटकं आणि पटकथा लिहिल्या.
त्यांना ‘हिंदू लिटररी प्राइज’, जर्मनी देशातील बहुमानाचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
‘ककल्ड’ कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला. दोनवेळा रॉकफेलो शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती.
किरण नगरकर यांचा जन्म 2 एप्रिल 1942 मध्ये मुंबईत झाला
त्यांचं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं.
मुंबईच्या सेंट झेवियर्समधून आणि पुण्याच्या फर्ग्यूसनमधून कॉलेज शिक्षण घेतलं.
त्यांनी इंग्लिश विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतलं.
त्यांचं कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वे मानणारं होतं.
मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून साहित्यक्षेत्रात त्यांचा लौकिक होता.
नगरकर जाहिरात क्षेत्रातही काम करत होते.
किरण नगरकर हे आपल्या लिखाणातून परखडपणे आपली मतं मांडत.
महाभारतावर आधारित ‘बेडटाइम स्टोरी’ या त्यांच्या नाटकाला काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर अनेक वर्षं बंदी होती.
‘कबीराचे काय करायचे’ आणि ‘स्ट्रेंजर अमंग अस’ ही त्यांची नाटकंसुद्धा गाजली.
‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘दी एक्स्ट्राज’, ‘ककल्ड’, ‘रावण आणि एडी’ अशी त्यांची पुस्तकं गाजली.
‘ककल्ड’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. जर्मन सरकारने ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
त्यांनी काही सिनेमांच्या पटकथा लिहिल्या तसंच ‘स्प्लिट वाईड ओपन’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला होता.