बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज सकाळपासून प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच हाती आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने स्पष्ट आघाडी घेतली आहे, तर महाआघाडी मोठ्या अंतराने मागे आहे. मात्र, या संपूर्ण निवडणूक निकालात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे चिराग पासवान. मागील निवडणुकीत फक्त 1 जागा जिंकलेल्या लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ने यंदा अविश्वसनीय पुनरागमन करत एनडीएकडून मिळालेल्या 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचा स्ट्राइक रेट दणदणीत ठरलेला आहे. प्रचार मोहिमेदरम्यान त्यांनी वारंवार 100% स्ट्राइक रेट साध्य करण्याचा दावा केला होता, आणि निकालातून त्यांचे म्हणणे मोठ्या प्रमाणात खरे ठरताना दिसते.
एनडीएने चिराग यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी प्रत्यक्ष कामगिरीतून सिद्ध करत 2020 मधील अपयशानंतर आपले राजकीय पुनरुत्थान भक्कम केल्याचे स्पष्ट दिसते. शिवाय या निकालांमुळे चिराग पासवान यांचे एनडीएमधील महत्त्व वाढल्याचेच नव्हे, तर बिहारच्या पुढील राजकीय समीकरणांत त्यांची महत्वाची भूमिका असणार हेही संकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एनडीए 189 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडी 50 जागांवर पुढे आहे.
दोन्ही आघाड्यांतील जागावाटपही विशेष महत्त्वाचे आहे. एनडीए कडून भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि जनता दल (युनायटेड) प्रत्येकी 101 जागांवर लढले, लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) 29, राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) 6, तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) 6 जागांवर स्पर्धेत होती.
दुसरीकडे महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) ने 143, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने 61, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) ने 20, विकासशील इंसान पार्टी ने 13, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ने 4, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने 9 जागांवर उमेदवार उभे केले होते. सध्याच्या स्थितीत एनडीएची आघाडी भक्कम दिसत असली तरी अंतिम निकालांची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. मात्र, एक गोष्ट नक्की या निवडणुकीत चिराग पासवान यांचे राजकीय वजन प्रचंड वाढले असून ते बिहारच्या सत्तासमीकरणातील महत्त्वाचे नेतृत्व ठरू शकतात.