बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या प्रचंड विजयासोबत काँग्रेस आणि आरजेडीचा झालेला ऐतिहासिक पराभव आता थेट पक्षाच्या आतल्या संघर्षात रूपांतरित झाल्याचे चित्र दिसत आहे. पराभवाच्या धक्क्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला असून, या पार्श्वभूमीवर पक्षाने मोठी आणि कडक कारवाई करत तब्बल सात नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी दिली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांवर पक्षविरोधी विधानं करण्यापासून ते संघटनात्मक शिष्टाचाराचे उल्लंघन केल्यापर्यंत अनेक गंभीर आरोप होते. वारंवार पक्षाच्या धोरणांवर टीका करणे, माध्यमांसमोर दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे आणि अधिकृत व्यासपीठाऐवजी सोशल मीडियावर तक्रारी मांडणे. या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर समितीने कठोर पावले उचलली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राठोड यांनी स्पष्ट केलं की, “पक्षाची एकता, प्रतिष्ठा आणि शिस्त धोक्यात आणणाऱ्या वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, म्हणूनच ही कारवाई करण्यात आली.” निलंबित करण्यात आलेल्या सात नेत्यांमध्ये आदित्य पासवान, शकीलुर रहमान, राजकुमार शर्मा, राजकुमार राजन, कुंदन गुप्ता, कांचना कुमारी आणि रवी गोल्डन यांचा समावेश आहे. हे सर्वजण पक्षातील विविध महत्त्वाच्या पदांवर होते. यातील काही जिल्हाध्यक्ष, काही सेवा दल आणि युवा काँग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकारी आहेत.
निवडणुकीनंतर सोशल मीडियावर आणि प्रिंट मीडियात तिकीट खरेदीचे आरोप, नेतृत्वावरील उघड नाराजी आणि अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात समोर आले होते. समितीने या सर्व आरोपांची पडताळणी केली असता, मिळालेली स्पष्टीकरणे अत्यंत असमाधानकारक आढळली. शिस्तपालन समितीनुसार, या नेत्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर अवमानकारक टीका करत काँग्रेसची प्रतिमा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अधिकृत उमेदवारांची घोषणा, निरीक्षकांची नियुक्ती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत पक्षाने केलेल्या स्पष्ट निर्णयांनंतरही त्यांनी सार्वजनिकरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि असंतोष वाढत होता.
समितीचा निष्कर्ष होता की, “या नेत्यांच्या कृतींमुळे पक्षाच्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला.” निवडणुकीतील पराभवानंतर दिसून येणारा कॉँग्रेसचा हा पहिला मोठा ‘आत्मशुद्धी’चा प्रयत्न मानला जात आहे. पक्षविरोधी भूमिका आणि गोंधळ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना आता शून्य सहनशीलता हा सात नेत्यांचे निलंबन होण्यामागील स्पष्ट संदेश मानला जातोय. आगामी काळात बिहार काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
हेही वाचा: Hammer Missile: ‘Hammer’ शस्त्र प्रणाली आता Made in India