मुंबई : मराठी बिग बॉस फेम आणि कॉमेडी अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कादंबरी कडू या कोरोनाविरुद्ध झुंज देत होत्या मात्र कोरोनासोबत या लढाईत त्या अयशस्वी ठरल्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. कादंबरी कडू यांना सुरुवातीला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिथून केईएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी कादंबरीच्या निधनानं भूषण कडूसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. भूषण कडू यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, भूषण कडू यांच्या पत्नीचं कोविडमुळे निधन झालं आहे. भूषण कडू यांना ७ वर्षाचा मुलगा आहे. आई कादंबरीच्या अचानक जाण्याचं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. प्रकिर्थ कडू असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. भूषण कडू हे मराठी बिग बॉसमध्ये देखील होते. त्यावेळी मुलगा आणि पत्नी यांना एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते. भूषण कडू हा सर्वोत्तम मराठी विनोदी अभिनेता आहे. टीव्ही कॉमेडी एक्सप्रेस शोमधील त्याने साकारलेल्या भूमिकांचं चाहत्यांनी अनेकदा कौतुक केले आहे.